फलटण : एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळाने उग्ररूप धारण केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे येथील नीरा उजवा कालव्यातून पिकांना पाणी देण्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याची सायपन पद्धतीने दिवसाढवळ्या चोरी होत आहे. पाणी चोरीमुळे लाखोंचा फटका शासनाला बसत असताना अधिकारी वर्ग याकडे मुद्दामहून कानाडोळा करीत आहे. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा वाहत जातो. यावर ३५ गावे अवलंबून असण्याबरोबरच पुढे जाणाऱ्या पाण्यावर माळशिरस, पंढरपूर, सांगोला हेही तालुके अवलंबून आहेत. फलटण तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, तालुक्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ती टँकरही या कालव्याद्वारे भरली जात असतात.तालुक्यात अनेक गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न बनला बनला आहे. दुष्काळी पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा परिस्थितीत नीरा उजवा कालव्यालगतच्या बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कॅनाल भरून वाहत असताना उसासाठी लगतच्या काही शेतकऱ्यांनी काही पाटकऱ्यांना हाताशी धरून कालव्यातून सरसकट पाणी चोरी सुरू केली आहे. काहीजणांनी मोठमोठेले पाईपलाईन थेट कालव्यामध्ये टाकून मोटारीद्वारे उपसा सुरू केला आहे. हे पाणी पाटाद्वारे थेट शेतामध्ये पोहोचविले जात आहे, तर काहीनी या पाण्यावर आपल्या विहिरींही भरून घेतल्या आहेत. दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत असताना संबंधित पाटकरी व काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करून अर्थपूर्ण व्यवहारात मग्न आहेत. (प्रतिनिधी)कालव्यातून पाणी उपसा दुसरीकडे बारामती व इंदापूर तालुक्यांतून वाहत जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाई तेथील अधिकाऱ्यांनी करताना पाईपलाइन व मोटारीही जप्त केल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात याच्या उलट परिस्थिती असून, अर्थपूर्ण व्यवहारात अधिकारी वर्ग मग्न दिसत आहेत. पाण्याच्या प्रचंड उपसामुळे शासनाचे लाखोंचे नुकसान होत असून, वरिष्ठांनीच लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.कार्यवाही करू : सिद्धमल पाणी चोरीसंदर्भात नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता सिद्धमल यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकार सातत्याने सुरूच असतात. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तरीही आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करू,’ असे मोघम उत्तरही सिद्धमल यांनी दिले. सातत्याने नीरा उजवा कालव्यातून पाणी चोरी होऊन शासनाचे लाखोंचे नुकसान होत असते, याला अधिकारी वर्गच जबाबदार असून, पाण्याच्या बदल्यात पैसे उकळले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.- युवराज शिंदे, (उपजिल्हाप्रमुख मनसे)
गावं तहानलेली... ऊसशेती मात्र भिजलेली!
By admin | Published: September 08, 2015 10:08 PM