आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की परिसरातील ग्रामपंचायतीची दिवाबत्तीची वीज थकबाकी न भरल्याने वीज वितरण कंपनीने खंडित केली आहे. मात्र, वाडीवस्तीवर ग्रामपंचायतीने दिवे बसविले आहेत. मात्र, ते चालूबंद करण्याची व्यवस्था केली नसल्याने चोवीस तास सुरू असतात. गावातील दिवाबत्तीचा वीजपुरवठा खंडित केल्याने वाड्यावस्त्या उजेडात व गावे अंधारात असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम भागातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी पाच वर्षांत विविध निधीतून प्रत्येक गावात वाडीवस्तीवर दिवाबत्तीची सोय केली आहे. गावातील दिवाबत्ती बंद सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई काम करतो. पण वाडीवस्तीवर वाढीव दिवाबत्तीची सोय केली आहे. त्या दिव्यासाठी ग्रामपंचायतीने चालूबंद करण्यासाठी फ्यूज बॉक्स बसविले नाहीत. त्यामुळे शेकडो दिवे, हाय मॅक्स रात्रंदिवस सुरू असतात. दिवाबत्तीची थकबाकी वीज बिले भरली नसल्याने चार-पाच दिवसांपासून गावे अंधारात आहेत. त्यामुळे वाडी वस्ती उजेडात व गावे अंधारात असल्याचे दिसत आहेत.
चौकट
आदर्की परिसरातील गावे डोंगर कपारीत व वाडीवस्तीवर मनुष्य वस्ती करून राहिले आहेत. दिवाबत्तीचा उजेड नसल्याने चोरटे व वन्य प्राणीमात्रांचा धोका असल्याने भीती व्यक्त होत आहे.