आदर्की : थकीत वीजबिलामुळे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडित केला होता. त्यावर सरपंच परिषद व संबंधित मंत्री यांच्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी केंद्र शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा मिळणारा निधी बंदिस्त गटारावरच खर्च होत असल्याने ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा व पथदिव्यांची वीजबिले भरण्याइतपत निधी शिल्लक नसल्याने महावितरण कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावे, वाड्या-वस्त्या अंधारात राहिल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले. यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची यशस्वीरित्या बैठक पार पडली व दिवाबत्ती तसेच नळपाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय होऊन चार दिवस उलटले तरी अजूनही गावे अंधारात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
(चौकट)
गावात गावकारभाऱ्यांचा ‘मान’ खाली...
ग्रामीण भागातील रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने गावकारभारी मान खाली घालून जात आहेत. कारण ग्रामपंचायत कर भरताना पाणीपट्टी, आरोग्यपट्टीबरोबर दिवाबत्ती करही घेतला जातो. पायाभूत सुविधांमध्ये पाणी, रस्ते, वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. आता गावकारभाऱ्यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आता तर मंत्री पातळीवर निर्णय होऊनही ग्रामीण भागातील बत्ती गुलच असल्याने संताप व्यक्त होत आहे.