वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मागील पंधरवड्यात अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि रात्रभर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ऐन भरात आलेल्या द्राक्षबागा मातीमोल झाल्या आहेत. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला असून, शासन स्तरावरून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.माण तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीशी झुंजून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. मात्र, दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे ९ नोव्हेंबरच्या अवकाळीने घात केला. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुष्काळाशी दोन हात करणारा शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने वरकुटे-मलवडीतील द्राक्षबाग शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबाग शेतकरी करत आहेत.
रात्रंदिवस राब-राब राबून द्राक्षबाग जपली खरी. भरघोस उत्पादन निघून साधारणतः १० लाखांच्या वर पैसे होतील, असं वाटत असतानाच अवकाळी पावसाने एका रात्रीत सोनेरी स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी -दादासाहेब बनसोडे, द्राक्षबागायतदार शेतकरी, वरकुटे-मलवडी