निर्बन्ध उल्लंघन : ३५ जणांवर २१०००/- दंडात्मक कारवाई; एकावर गुन्हा दाखल.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : जिल्ह्यात मंगळवार, दि. २५ मेपासून सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. शहरातील नीरव शांतता पाहून गतवर्षीच्या लॉकडाऊनची प्रकर्षाने जाणीव झाली. दरम्यान, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ जणांवर पोलिसांनी कारवाई करून २१ हजारांचा दंड वसूल केला.
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढत चालला आहे. हा संसर्ग रोखण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात दि. २५ मे ते १ जून या कालावधीत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन सुरू होऊन महिना झाला तरी लोक या ना त्या कारणाने मोकाटच फिरत होते. प्रशासन दंडात्मक कारवाई करीत होते. तरी सुद्धा लोकांच्या फिरण्यावर कोणताच फरक पडत नव्हता. कठोर निर्बंधांमुळे बाजारपेठेतील गर्दी पूर्णपणे ओसरली.
दरम्यान, कडक निर्बंध असतानाही घराबाहेर पडणाऱ्या ३५ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत २१ हजारांचा दंड वसूल केला आ, तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा आलेख रोखण्याकरिता आठवडाभर बाहेर न पडल्यास संसर्ग साखळी तुटण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले आहे.