पुसेगाव :
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून किराणा दुकान सुरू ठेवल्याबद्दल पुसेगाव येथील एक दुकान सील करून एक हजार रुपये दंड तसेच विनाकारण फिरणाऱ्या ४२ व्यक्तींच्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व महसूल विभागाचे तलाठी गणेश बोबडे तसेच पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप, किरण देशमुख, सुनील अब्दागिरी यांनी ही कारवाई केली.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठलेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता लागू केलेल्या निर्बंधाचे लोक सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभारी जिल्हाधिकारी यांनी १० मेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशान्वये औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही शिवलिंग हिंगमिरे यांनी आपले किराणा दुकान हे उघडे ठेवले होते. ही बाब निदर्शनास येताच पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी सकाळी ११ वाजता सातारा-पंढरपूर रोडनजीक ही कारवाई केली. हे दुकान पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात आले आहे. यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. येथील छत्रपती शिवाजी चौकात सध्या पोलिसांचा बंदोबस्त असून, विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस व महसूल विभागातर्फे कारवाई करून पोलिसांनी ४२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच २४ विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून चार हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे. तसेच आतापर्यंत तीन किराणामाल दुकान सील करून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे.
०८पुसेगाव
फोटो :
पुसेगाव येथील दुकान सील करताना पोलीस कर्मचारी सचिन जगताप, किरण देशमुख, सुनील अब्दागिरे व रवी जाधव, सुरेश कंठे व इतर कर्मचारी उपस्थित होते.