कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी ठिकठिकाणी दगडफेक करीत दुकाने, हॉटेल फोडली. तर रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कऱ्हाड तालुक्यात बुधवारी बंदला हिंसक वळण लागले. शहरात सकाळी दुचाकी रॅली काढून आंदोलकांनी बंदचे आवाहन केले. दत्त चौकातून निघालेली दुचाकी रॅली मुख्य बाजारपेठमार्गे कृष्णा नाक्यावर व तेथून पुन्हा दत्त चौकाकडे येऊन कार्वे नाक्याकडे गेली.
मलकापूर, आगाशिवनगर परिसरातही दुचाकी रॅलीने बंदचे आवाहन केले. कोल्हापूर नाक्यावर या रॅलीची सांगता करण्यात आली.दरम्यान, सकाळी अकरानंतर शहरात बंदला हिंसक वळण लागले. दुपारी काही आंदोलक शहरातील मुख्य बाजारपेठेसह मंडई परिसरात गेले. त्यावेळी काही दुकानांवर दगडफेक झाली. तसेच बसस्थानकसमोरील हॉटेलवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली.
या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आले. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दुपारी कऱ्हाड -तासगाव राज्यमार्गावर कार्वेनाका येथे, कऱ्हाड -मसूर रस्त्यावर उत्तर कोपर्डे येथे, कऱ्हाड -पाटण मार्गावर वारुंजीफाटा येथे आणि तांबवे परिसरातही रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. या घटनांमुळे तालुक्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.