लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर थेट होऊ लागला आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह आजारी असलेल्या लेकरांना विव्हळताना मुलांना बघणं पालकांच्या जिवावर येतंय. तर कोविडमुळे रुग्णालयात दाखल करून उपचार घेणेही पालक टाळू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरण आणि त्यात कोविड संसर्गाचा धोका वाढता असल्याने आवश्यक खबरदारी घेऊनही मुलं आजारी पडू लागल्याने अनेक कुटुंबांत चिंतेचे वातावरण आहे. घरात झोपून असणाऱ्या मुलांचे हाल पालकांना सहन होत नाहीत. वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू असले तरीही रुग्णालयात दाखल करण्याची मानसिकता पालकांची दिसत नाही. औषधे आणून घरीच उपचार सुरू असल्याने अवघं घर शांत झाले आहे. उत्सव काळातील घर आवरण्याचाही वेळ मिळत नसल्याने यंदा लेकरं बरी झालीच तर उत्सव, अशी मानसिकता कुटुंबियांनी करून ठेवली आहे.
चौकट :
वातावरणातील बदलांमुळे रुग्ण वाढले
वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल’ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यात लहान मुलांची संख्या अधिकची असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याची लागण झाल्याने अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून येतात. नाक गळणे, श्वास घ्यायला त्रास होणं आणि खोकला ही लक्षणेही आढळतात. कोरोनाच्या लक्षणात तीव्र ताप, सततचा खोकला, चवगंध जाणे यातील एकतरी लक्षण हमखास आढळून येतात.
ही काळजी घ्या
पावसाची उघडझाप सुरू असल्याने मुलांना पावसात भिजण्यापासून वाचवणं महत्त्वाचे आहे. बाहेरून कुठूनही आलात तरी हात स्वच्छ धुण्याची सवय अवलंबणं गरजेचं आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळणं आणि आहारात भाज्या, फळे, मोड आलेल्या धान्यांचा समावेश करावा. सध्या डेंग्यूच्या प्रकोप असल्याने अंगभर कपडे घालणे आणि झोपण्यासाठी मच्छरदाणीचा वापर आवश्यक आहे.
कोट :
वातावरणाील बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. यात पहिल्या टप्प्यातच उपचार घेतले, तर मुलांना त्रास फारसा जाणवत नाही. उपचाराला विलंब झाला, तर मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. पण कोविडमुळे पालक यासाठीही आता तयार नाहीत. त्यामुळे आवश्यक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ