कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेल्या संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (वय ४८, रा. पनवेल, जि. रायगड) याच्याकडे कसबा बावडा पोलिस लाईन परिसरातील एका कक्षामध्ये रविवारी दिवसभर प्रमुख आठ प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. या सर्वांना बगल देत त्याने तपासकामासाठी असहकार्य केल्याने रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती उपलब्ध नव्हती. येरवडा कारागृहातून ताबा घेतल्यापासून तावडे राजारामपुरीच्या कोठडीत रात्री व पहाटे काही तास जप करीत असे. त्यातून तो मानसिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची जपमाळ काढून घेतली. त्यानंतर ती परत द्यावी यासाठी तो विनवणी करीत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी तावडेला सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शनिवारी (दि. ३) रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आले. रात्रभर पोलिस ठाण्यात निरीक्षक अमृत देशमुख, अरविंद चौधरी तळ ठोकून होते. त्यानंतर रविवारी पहाटे प्रातर्विधी झाल्यानंतर त्याला पोलिस मुख्यालयात आणले. या ठिकाणी पोलिसांसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, नागरिकांची वर्दळ असल्याने कसबा बावडा पोलिस लाईन येथील बॉम्बशोध पथकाच्या कक्षाशेजारील बरॅकमध्ये त्याला दिवसभर ठेवले. याठिकाणी त्याच्याकडे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह तपास पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यावेळी त्याने प्रत्येक प्रश्नाला बगल देत पोलिसांना तपासकामात असहकार्य केले. तावडे हा येरवडा कारागृहात असताना काही पुस्तके व साधनेचा जप करीत होता. ‘एसआयटी’ने ताबा घेतल्यानंतरही तो काही तास जप करीत असे. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी ती जपमाळ काढून घेतली. रात्री उशिरा त्याची राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी) -------------- ‘पोलिस क्लब’मध्ये चर्चा तावडेकडे कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करायची यासंबंधी पोलिस अधीक्षक देशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यात पोलिस लाईन येथील ‘पोलिस क्लब’च्या इमारतीमधील दूधगंगा कक्षात सुमारे दोन तास गोपनीय चर्चा झाली. जेवणाची तपासणी तावडेला हॉटेलमधील जेवण दिले जात आहे. जेवणाचे पार्सल घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा खायला देऊन त्यानंतर तावडेला दिले जाते. जेवणासह चहा, पाणी व औषधे तपासून दिली जात आहेत. अॅड. इचलकरंजीकरना ताटकळत ठेवले तावडेची चौकशी आमच्यासमोर व्हावी, त्यासाठी आम्हाला हजर राहण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे केला होता. त्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानुसार अॅड. इचलकरंजीकर रविवारी सकाळी अकरा वाजता पोलिस मुख्यालयात आले. त्यांनी तपास अधिकारी सुहेल शर्मा यांना फोन केला. त्यांनी बोलावितो असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर त्यांना कोणताही निरोप देण्यात आला नाही. अॅड. इचलकरंजीकर दिवसभर पोलिस मुख्यालयात ताटकळत बसले होते. पोलिस रात्री बोलावतील या आशेने ते कोल्हापुरात उशिरापर्यंत थांबून होते. --------------------------------- कोट : वीरेंद्र तावडेकडे पानसरे हत्येप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यासाठी चार पथके काम करीत आहेत. तो तपासकामी असहकार्य करीत असल्याने अद्याप ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. - प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक या प्रश्नांना बगल पानसरे यांच्या कार्यक्रमांना तू थेट विरोध केला होतास? मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे तसेच भूमिगत असणारा ‘सनातन’चा साधक विनय बाबूराव पवार यांच्या संपर्कात केव्हापासून आहेस? संजय साडविलकर यांना भेटून दोन रिव्हॉल्व्हर तयार करून देण्याची मागणी केली होतीस? त्यासाठी दोन साथीदार पाठविले होतेस? अशी विचारणा केली असता त्याने या प्रश्नांना बगल देत असहकार्य दाखविले.
वीरेंद्र तावडे याचे तपासात असहकार्य
By admin | Published: September 04, 2016 11:55 PM