सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.४२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता, तर धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने सध्या दडी मारली आहे. त्यामुळे अनेक भागांत खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे, तर पश्चिम भागातही तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा २ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून ९१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ५ तर यावर्षी आतापर्यंत १०६४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत १ तर जूनपासून १२१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.४२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, तर ४६४९ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मागील १२ दिवसांपासून हा विसर्ग सुरू होता. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे.
.......................................................