सातारा : पश्चिम भागातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना आणि नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर कण्हेर, उरमोडी आणि तारळी धरणांतील विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २० दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ५२ वरुन ९० टीएमसीच्या वर गेला. गेल्या काही दिवसांत कोयनेत मोठ्या प्रमाणात साठा झाला. त्यातच सतत पाऊस आणि साठा वाढत असल्याने धरणातून १५ आॅगस्टपासून विसर्गही सुरू करण्यात आलेला. त्यासाठी धरणाचे सहा दरवाजे १० फुटांपर्यंत वर उचलण्यात आले होते. तसेच पायथा वीजगृहातूनही विसर्ग सुरू होता.
या विसर्गामुळे कोयनेतील पाणीसाठा ९१ ते ९२ टीएमसीच्या दरम्यान राहिला. तर आता पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी होत चालली आहे. परिणामी गुरुवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद होणार आहे. आता फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ४१ आणि यावर्षी आतापर्यंत ३७११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला सकाळी ४१ व जूनपासून ४२११ त्याचबरोबर महाबळेश्वरला ४७ आणि आतापर्यंत ४१३२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत धोमला ५ मिलिमीटर पाऊस झाला. तर कण्हेर धरण क्षेत्रात ८, बलकवडी १५, उरमोडी धरण १७ आणि तारळी धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या धोम धरणातील विसर्ग बंद असून कण्हेर, उरमोडी, तारळी धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. बलकवडी धरणातून २२०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच असलातरी हे पाणी धोम धरणात येत असते.