फलटण : पंचायत समितीच्या सभापतीपदी विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची तर उपसभापतीपदी संजय सोडमिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
फलटण पंचायत समितीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असून त्यांच्या सूचनेनंतर शिवरुपराजे खर्डेकर यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा व रेखा खरात यांनी उपसभापती पदाच्या राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी आज, (दि.२९) रोजी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे विश्वजितराजे नाईक-निंबाळकर व संजय सोडमिसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पंचायत समिती सदस्य शिवरूपराजे खर्डेकर, सचिन रणवरे, रेश्मा भोसले, संजय कापसे इतर सदस्य उपस्थित होते. सभापतीपदासाठी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर तर उपसभापतीपदासाठी संजय सोडमिसे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सदर निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
पंचायत समितीच्या सभापतीपदी युवा नेतृत्व विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्याची मागणी वेगवेगळ्या संघटना तसेच युवावर्ग सातत्याने करत होता. आज विश्वजितराजे यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवावर्गाने तसेच विविध संघटना, पदाधिकारी यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.