पाचगणी : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून निर्मिती केली जात असलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पास न्यू इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.
यावेळी नगरसेविका नीता कासुर्डे, नगरपरिषदेचे कर्मचारी सुरेश मडके, गणेश कासुर्डे, घनकचरा ठेकेदार सुनील सनबे उपस्थित होते. नगराध्यक्षा कऱ्हाडकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, ‘शहरातील सर्व कचरा वर्गवारी करून या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर त्यावर या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रीय खत तयार केले जाते.
प्लास्टिकपासून फर्निश आॅईल तयार केले जाते. रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस बिघडत असून, त्यासाठी लोक पारंपरिक सेंद्रीय खत वापरून जमिनीचा कस वाढविण्यास मदत होणार आहे. पाचगणी शेजारील गावांमधील लोकांना या खताची विक्री केली जाणार आहे. याबाबतचे खतविक्री केंद्र पाचगणी नगरपालिकेने सुरू केले आहे.
या ठिकाणी शेतकरी बांधवांना पाच रुपये किलोने खताची विक्री केली जाणार आहे. प्लास्टिकपासून निर्मिती केलेले फर्निश आॅईल रस्ते निर्मिती करताना डांबरामध्ये वापरल्याने त्या रस्त्याच्या डांबरचे आर्युमान वाढणार आहे. त्यामुळे रस्ते लवकर खराब होणार नाहीत.’
पाचगणी नगरपरिषदेने निर्मिती केलेल्या हा प्रकल्प पाहण्यास येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दोनच दिवसांपूर्वी स्वच्छ भारत पॉर्इंट येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सोलापूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे तसेच स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक गिरीश तंबाखू, आरोग्य निरीक्षक नागटिळक, विजय कुमार पिसे, उमेश कोळेकर, चंद्रकांत मिरखोर, राजकुमार सारोळे, प्रशांत माने, दीपक शेळके या अधिकारी व पत्रकारांनी भेट देऊन या प्रकल्पाविषयी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांच्याकडून माहिती करून घेतली. या वेळेस नगरसेवक प्रवीण बोधे, अनिल वन्ने, नगरसेविका सुलभा लोखंडे, उज्ज्वला महाडिक, रेखा जानकर व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.