सातारा : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही.अभिनेते विपुल साळुंखे यांनी मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकी जपत आसनगाव, ता. कोरेगाव येथे हाती टिकाव, खोरे हाती घेऊन श्रमदान केले.पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या चौथ्या पर्वास अलोट उत्साहात सुरुवात झाली असून, कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दुष्काळ हद्दपार करण्याचा विडाच जणू ग्रामस्थांनी उचललेला आहे. त्यामुळे ओसाड माळरानावर श्रमदान करणाऱ्यां जलदुतांमुळे शिवार फुललं आहे.
दरम्यान, मंगळवारी अभिनेते विपुल साळुंखे यांनी सहपरिवार आपल्या गावी भादे, ता. खंडाळा येथे मतदान केले. त्यांनी आसनगावमधील डोंगराच्या पाथ्याला हातात टिकाव, फावडे, घमेलं घेऊन श्रमदान केले. त्यांच्यासोबत नम्रता साळुंखे, दिशा साळुंखे, विराज साळुंखे व संग्राम साळुंखे यांनीही श्रमदान करून समतल चर खोदले.यावेळी विपुल साळुंखे म्हणाले, ह्यकोरेगाव तालुक्यातील उत्तर भागावर बहुतेकवेळा निसर्गाची वक्रदृष्टी असते. यंदाही प्रतिकूल परिस्थितीने डोळे वटारले आहेत. दुष्काळाने जनता होरपळून निघाली आहे. पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. अशी सर्व विपरित परिस्थिती असली तरी प्रतिकूल परिस्थितीच्या छताडावर पाय रोवून संकटांना भिडण्याची अंगीभूत वृत्ती आसनगावकरांनी सोडलेली नाही. याचाच प्रत्यय इथे आल्यानंतर येते.
अगदी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धांचे श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावल्यास राज्यातील प्रत्येक गाव पाणीदार होणार आहे.
यावेळी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका युंगधरा साळेकर, शाखाप्रमुख यशवंत साळेकर आसनगावच्या उपसरपंच स्मिता शिंदे, संभाजीराव शिंदे, अनिल शिंदे, प्रदीप शिंदे, वीरसिंग शिंदे, शंकर गाडे, जगदीश शिंदे, प्रशांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.