वडगाव हवेली येथील परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सिद्धनाथ मंदिराच्या व चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याला निसर्गरम्य परिसरात हा तलाव असून, याठिकाणी सांडव्यावरून खडकावर पडणाऱ्या पाण्यामुळे आपसुकच धबधबा तयार होऊन परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे, तसेच या तलावाच्या पूर्वेस डोंगर-दऱ्यांमध्ये छोटे-मोठे अनेक धबधबेही सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत. यावर्षी हा पाझर तलाव जलद गतीने भरला आहे. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तलाव भरून वाहिल्याने येणाऱ्या उन्हाळ्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, शेतकरी समाधानी आहेत.
कार्वे, कोरेगाव, शेणोली, शेरे, दुशेरे, कोडोली आदींसह परिसरात गेली दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. येथील पाझर तलाव भरून वाहिल्याने ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ओढ्यालगतची शेती जलमय झाली आहे.
फोटो : २४केआरडी०१
कॅप्शन : वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्याद्वारे वाहणाऱ्या पाण्यामुळे याठिकाणी आकर्षक धबधबा तयार झाला आहे. (छाया : संतोष खांबे)