लोकमत न्यूज नेटवर्कवाई : ‘लाचखोर नगराध्यक्षांचा निषेध असो, नगराध्यक्षांनी राजीनामा दिलाच पाहिजे, नगराध्यक्ष हाय-हाय, राष्ट्रवादीचा विजय असो,’ आदी घोषणा देत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाई नगराध्यक्षांच्या केबिनला व त्यांच्या नावाच्या पाटीला काळे फासले. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलिसांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीने गोंधळ थांबविला; मात्र नगराध्यक्षांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराहीे दिला आहे. दरम्यान, मंगळवारी शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.तीर्थक्षेत्र आघाडीचे सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पालिकेच्या बाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन नगराध्यक्षांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेत जाणारे दोन्ही मार्ग महिला सदस्यांनी रोखून धरले होते. पदाधिकारी, कार्यकर्ते नगराध्यक्षांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. निषेध फलकही लावले गेले होते. या आंदोलनात दोन गाढवं लक्षवेधी ठरली. नगराध्यक्षांची प्रतीकात्मक धिंड काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाढवांना आंदोलनाच्या ठिकाणी आणलं होतं. नगराध्यक्षा आल्याच तर त्याना काळं फासण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या हातात काळ्या रंगाचे डबे हातात घेऊन उभ्या होत्या. वाई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्यानी गाढवांच्या दिशेने आपला मोर्चा वळवून ती बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी आघाडीचे पदाधिकारी, सदस्य याच्याबरोबर पालिकेत सुमारे पाऊन तास चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची व कायदा हातात न घेण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रतापराव पवार, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक दीपक ओसवाल, अॅड. श्रीकांत चव्हाण, भारत खामकर, आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगरसेवक प्रदीप जायगुडे आदी पदाधिकारी व सदस्यांनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत निषेध व्यक्त केला. व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. लाचलुचपत विभागाने पैसे घेताना नगराध्यक्ष व त्याच्या पतीला रंगेहाथ पकडलेले असताना भाजपचे काहींनी यामागे राष्ट्रवादीचे षडयंत्र असल्याचा आरोप करून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करत असल्याने आम्ही सर्व संतप्त झालो असून, पक्षाची बदनामी करणाऱ्या त्या भाजप पदाधिकाऱ्यांचाही यावेळी जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. एका दिवसात त्यांना जामीन कसा होतो? असा प्रश्न करत नगराध्यक्षांनी आपल्या संभाषणात उल्लेख केलेल्या ‘त्या’ दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी येडगे यांच्याकडे केली. ‘नगराध्यक्षांच्या लाचखोरीमुळे त्यांचा या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार संपलेला आहे. त्यांनी आता सभागृहात येण्याचा वेडेपणा न करता तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनीही पालिकेची पायरी चढू नये, अन्यथा आमच्याशी गाठ आहे,’ असा सूचकवजा इशारा दिला आहे. यावेळी महिला सदस्या व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत नगराध्यक्षांना पालिकेत काम करून देणार नसल्याचा इशारा दिला आहे.सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक येडगे यांनी लाचलुचपतच्या कारवाईशी पोलिसांचा कसलाही संबंध नाही हे स्पष्ट केले. ‘लाचलुचपत हा स्वतंत्र विभाग आहे. कायद्याने रात्रीच्या वेळी महिलांना अटक करता येत नाही, त्यामुळे न्यायालयाने सर्व बाबी तपासून त्यांना जामीन दिला आहे. संभाषणात उल्लेख झालेल्या त्या दोन नगरसेवकांवरील कारवाईबाबत आपल्या मागणीचे निवेदन लाचलुचपत विभागाला द्यावी,’ अशी सूचना करून आंदोलन मागे घेण्याची विनंती येडगे यांनी केली.दरम्यान, महा आघाडीच्या वतीनेही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये नगराध्यक्षांना पालिकेच्या कामकाजात सहभागी करून न घेण्याची मागणी केली आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पालिकेच्या आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नगराध्यक्षा पालिकेकडे फिरकल्या नाहीत..लाच घेताना रंगेहात सापडलेल्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र हे षड्यंत्र असल्याचे सांगून नगराध्यक्षांची पाठराखण केली आहे. तसेच कितीही दबाव वाढला तरी राजीनामा द्यायचा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. सोमवारी नगराध्यक्षा पालिकेत नेहमीप्रमाणे येऊन बसणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या एंट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले होते; परंतु राष्ट्रवादीचा पवित्रा पाहूून त्या पालिकेकडे फिरकल्या नसल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची काळीकुट्ट केलेली केबिन दुपारपासून कर्मचारी साफ करीत होते.
वाईत राष्ट्रवादीचा राडा!
By admin | Published: June 12, 2017 11:23 PM