सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे उन्हाळी पिकात वाढ झाली आहे. वाघोशी येथील पवार कुटुंबीयांनी उन्हाळी बाजरीचे पीक केले, पीक जोमाने आले; पण पक्ष्यांचे थवे पाहून बाजरीची राखण करण्याऐवजी सर्व बाजरी पीक पक्ष्यांना सोडून दिले आहे.
फलटण तालुक्यात दहा वर्षांपूर्वी भयानक दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी नव्हते. नागरिकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या; पण फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून पाणी नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान दोन पाळ्या सुटत असल्याने पाणीटंचाई जाणवत नाही.
पाणी उपलब्ध पाहून शेतकºयांनी ऊस, भुईमूग, टॉमटो, मिरची, मका अन्य पिके घेतली.त्यामुळे मोर, कावळा, व्हला, चिमणी, चितर अन्य पक्ष्यांना चारा उपलब्ध नसल्याने वाघोशी येथील शेतकरी तुषार पवार यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेऊन पाण्याच्या दोन-तीन पाळ्या देऊन पीक जोमात आणले. कणसेही चांगली भरली, त्याची राखण करण्यासाठी पवार कुटुंबीय सकाळ-सांयकाळ जात असत; पण काही पक्षी दिवसभर झाडावर किलबिलाट करत असल्याचे पाहून पवार कुटुंबीयांनी पक्ष्यांसाठी ३० गुंठे बाजरी सोडून दिल्याने प्राणीमित्रांमधून कौतुक होत आहे.
पाणी उपलब्ध पाहून अन्य पिकांबरोबर बाजरीचे पीक घेतले. पाण्याच्या तीन पाळ्या देऊन पीकही चांगले आले; पण त्याची राखण करताना शेकडो पाखरे घिरट्या घालत ओरडत होते. काही पाखरे दिवसभर झाडावर बसून ओरडत होती, म्हणून बाजरी पीक पाखरांना सोडून देण्याचा निर्णय घेतला.- रमेश पवार, शेतकरी, वाघोशी