वाई : वाई शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू असून प्रशासनाने विनामास्क फिरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करुन ७६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
वाई नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने शहरात संयुक्तिकरीत्या 'ब्रेक द चेन' मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील आठवडी बाजाराला बंदी आहे. मुख्य रस्त्यांवर भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. त्यांना आपापल्या प्रभागात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत नगर परिषदेमार्फत फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणारे व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून ७६ हजारचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवेतील वगळता इतर कोणत्याही आस्थापना सुरू दिसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर
नगर परिषदेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेमार्फत विभागनिहाय शीघ्र कृती पथके बनविण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत कार्यालयीन सुटीच्या दिवशीही कारवाया सुरू राहणार आहेत. या पथकामार्फत दुकाने वेळेत बंद न केल्यामुळे गुरुवारी एका दिवसात २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग यांची ऑनलाइन बैठक झाली.