वाई : निसर्गाची देणगी लाभलेल्या पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक वाई-पाचगणी या अत्यंत नागमोडी वळणे तीव्र चढ-उताराच्या घाटातून जात असतात. पावसाळ्यात या घाटात अनेकवेळा दरडी कोसळून रस्ता बंद होऊन प्रवाशांचे शिक्षणासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होतात. आजही अनेक ठिकाणी डोंगर कपाऱ्यातील दरडी कोसळून अपघात व अडचणी निर्माण होण्याची परिस्थिती असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून पाचगणी-महाबळेश्वरला ओळखले जाते येथील निसर्ग सौंदर्य उंच उंच पर्वत थंड हवामान यामुळे येथे जगभरातून हजारो पर्यटक येत असतात. त्यांच जाण्या-येण्याचा मुख्य रस्ता हा पाचगणी हा घाट असून हा अत्यंत नागमोडी वळणे तीव्र चढ-उताराचा आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी मोठ-मोठ्या मशिनरी, दगड फोडण्याचे स्फोटके याचा वापर केल्याने अनेक कडे-कपारींना तडे गेले आहेत. त्यावर ऊन-वारा व हवामान याचा परिणाम होऊन पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी सुटण्याचे प्रकार घडले आहेत. पायाखालची भर खचल्याने अनेक मोठमोठे महाकाय दगडही कोसळले आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघाताची व अडचणीची परिस्थिती निर्माण होते. यापुढेही अशी परिस्थिती घडण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. यास्तव मोठा निधी उभारुन सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
वाई-पाचगणी घाट... काय त्याची बिकट वाट!
By admin | Published: August 04, 2015 11:15 PM