वाई : गेल्या काही महिन्यांपासून कोरानाबाधितांची संख्या कमी येत होती, परंतु १५ मार्चनंतर राज्यासह देशात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट असून परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी स्थिती आहे. गतीने कोरोना संसर्ग होणाऱ्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराट्रातील असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत आहे. तसेच राज्यात काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
वाई तालुक्यात पंधरा, वीस अशा येणाऱ्या बाधितांच्या संख्येत वाढ होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संख्या पन्नासच्या वर गेली असून गेल्या पाच दिवसात २४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ५ एप्रिलला ७१ बाधित सापडले असून वाई शहरातील २२ रुग्ण आहेत. मार्च महिन्यात ४३८ रुग्ण बाधित सापडले आहेत. ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पाहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. कोरोनाची लस आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. तरीही सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अभियान चालू केले आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंध घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यवसायिकांनी नियमांचे काटेखोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाकडून फिरत्या पथकांद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत.
तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
चौकट
सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून व्यावसायिक, नागरिकांनी सावधगिरी बाळगून स्वतःच गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन केले पाहिजे. लग्नसमारंभात, बाजारात नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण मोहीम चालू असून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे
- उदयकुमार कुसूरकर
गटविकास अधिकारी, वाई पंचायत समिती, वाई