सातारा : जिल्ह्यात गुरुवारी पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या असून, ओढ्याला आलेल्या पुरामध्ये दोघेजण वाहून गेले. यामध्ये वाईतील घटनेत एक महिला तर सातारा तालुक्यातील ताकवली येथे ओढ्याला आलेल्या पुरामध्ये एक पुरुष वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशा पावसातही ग्रामीण भागामध्ये लोक शेतात काम करत आहेत. सायंकाळी शेतातून घरी परत येत असताना ओढ्यावर आलेल्या पुरातून जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना घरी यावे लागते. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील ताकवली येथील कृष्णा गणपत वाईकर हे साडंवलीला गेले होते. मात्र, परत ते ताकवलीला पोहोचले नाहीत. वाटेतील ओढ्याच्या पुरात ते वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामस्थ तसेच कुटुंबाने गुरुवारी शोध मोहीम हाती घेतली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे रात्री उशिरा ते गायब असल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.दरम्यान, वाई येथील रविवार पेठेतील किवरा ओढ्याला आलेल्या पुरात शिल्पा प्रकाश धनावडे (वय ४७, रा. रविवार पेठ, वाई) या वाहून गेल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
Satara: वाईत महिला, ताकवलीत पुरुष ओढ्यातून गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:08 PM