वाई : ‘फेस्टिव्हलमुळे वाईचे नाव महाराष्ट्रभर पसरले आहे. वाई फेस्टिव्हल वाईचे वैभव आहे. यामुळे येथील अनेक कलाकार, खेळाडू, महिलांना पुढे जाण्याची संधी मिळत आहे. वाई फेस्टिव्हलला वाई नगरपरिषद तसेच वाईकर सहकार्य करतील,’ असे आश्वासन नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी दिले.वाई फेस्टिव्हलचा उद्घाटन समारंभ महागणपती घाटावर झाला. नगराध्यक्ष भूषण गायकवाड, वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांच्या हस्ते तसेच उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. शरद अभ्यंकर, नीलम कुलकर्णी, आनंद लोळे, राजेंद्र धुमाळ, मदन पोरे, सुरेखा यादव, सचिन येवले, प्रमोद शिंदे, डॉ. नीलम भोसले, अलका मुरूमकर उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी वाई जिमखान्याने मल्लखांब तसेच योगासनाची साहसी प्रात्यक्षिके सादर केली. वाईकर रसिकांची मने या खेळाडूंनी जिंकली. उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘देश मेरा रंगीला’ हा संगीतावर आधारित व देशातील विविधता दाखविणारा कार्यक्रम झाला. निवेदक सुनील सुतार यांनी प्रेक्षकांना आपल्या निवेदनाने मोहित केले. एकाहून एक जबरदस्त गीते आणि नृत्य यामुळे वाईकर रसिक मंत्रमुग्ध झाले.प्रेक्षकातून आपल्या मावळ्यासह प्रवेश करणारे छत्रपती शिवराय, आपल्या भक्तांची समस्या सोडविणारे साईबाबा, दहीहंडी फोडणारे गोविंदा, भक्तांच्या समस्यांना धावून जाणारी शेरावाली जय मातादी, अस्सल मराठमोळी लावणी ‘मला जाऊ द्या ना घरी’ झाली. त्याचबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना ‘वंदे मातरम्’ करीत या कार्यक्रमाची सांगता झाली. ८६ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बबन लोळे यांचा वेदमूर्ती अभ्यंकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या अध्यक्षा सोनाली शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव मदनकुमार साळवेकर यांनी परिचय करून दिला. वाई फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘फेस्टिव्हल’मुळे वाईचे नाव महाराष्ट्रात
By admin | Published: December 22, 2014 12:04 AM