लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित, शेती, पिकांची हानी झाली. तसेच जिल्हा परिषदेकडील तब्बल १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची वाट लागली. सर्वाधिक रस्त्यांचे नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १९ कोटी तर कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी १०७ कोटी लागण्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, रस्ते दुरुस्त होईपर्यंत धोकादायक प्रवास असणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कास, पाटण या तालुक्यांत तुफान पाऊस पडला होता. पुरामुळे रस्ते तुटून गेले, पूल वाहिले. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाच्या मदतीने रस्ते दुरुस्त करत आहेत. पण, रस्ते कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीत प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदेकडील १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाटण तालुक्यात ५१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना फटका बसला. तर वाई तालुक्यात २३० किलोमीटर, महाबळेश्वर तालुक्यात १९८ किलोमीटर, कऱ्हाड १५७, सातारा १२१, जावळी तालुक्यात ४६ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. हे सर्व रस्ते ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग आहेत. माती भराव वाहून जाणे, दरड कोसळून रस्ता बंद होणे, मोऱ्या वाहून जाणे, संरक्षक भिंती पडणे आदी स्वरूपात रस्त्यांचे नुकसान झालेले आहे.
अतिवृष्टीतील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी १८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी प्राथमिक अहवालानुसार १०७ कोटी ३५ लाख लागू शकतात. त्याचबरोबर नुकसानग्रस्त रस्त्यांची नवीन माहिती समोर आल्यानंतर निधी आणखी लागणार आहे. रस्ते कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पाटण तालुक्यात ५१ कोटी २० लागणार आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात १९ कोटी ८० लाख, वाई तालुक्यात १४ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात ९ कोटी ८१ लाख, जावळी ४ कोटी ६० लाख आणि सातारा तालुक्यासाठी १ कोटी ८१ लाख रुपये लागणार आहेत.
जिल्हा परिषदेकडील रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्यामुळे निधी मिळून रस्ते दुरुस्त होईपर्यंत वाहनधारकांचा प्रवास हा खडतरच राहणार आहे.
चौकट :
तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा प्रयत्न...
जिल्हा परिषदेकडील मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किमान एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. ३१ जुलैअखेर अतिवृष्टीत सापडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समिती सभेत रस्ता दुरुस्तीसाठी आपत्कालीनमधून निधी देण्याचा ठरावही झाला आहे. त्यामुळे काही निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.......................................................................