ढेबेवाडी ते नवारस्ता हा २१ किलोमीटरचा घाटरस्ता असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्यावेळी मृत जनावरे व दुर्गंधीयुक्त अन्नपदार्थ टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. घाटातून प्रवास करताना प्रवाशांना तोंडाला रूमाल बांधून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घाटात कचरा टाकण्याचे प्रकार केले जात आहेत.
कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यावरील मानेगाव व काढणे गावच्या हद्दीत यापूर्वी मृत जनावरे टाकली जात होती. त्यावेळी या मार्गावर मोठी दुर्गंधी पसरत होती. यावर उपाय काढण्यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या परिसरात मृत जनावरे टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्याठिकाणी फलक लावल्यानंतर मृत जनावरे टाकणे बंद झाले. आता हाच प्रकार ढेबेवाडी ते नवारस्ता घाटात सुरू आहे. तो थांबविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- चौकट
घाट बनतोय अपघाती क्षेत्र
ढेबेवाडी ते नवारस्ता या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणावरून कधी भरधाव तर कधी ओव्हरटेक करण्याचा वाहनचालक प्रयत्न करतात. अशावेळी अचानक वाहनांच्या आडवी जनावरे येतात. त्यामुळे अपघात होतात. मुळताच हा घाट अपघाती म्हणून ओळखला जातो. या घाटात कायम छोटे-मोठे अपघात झाले असून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
- कोट
ढेबेवाडी ते नवारस्ता घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. घाटात मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच इतर दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येत असून त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
- रूपेशकुमार भोई
प्रवासी, मंदुळकोळे खुर्द