लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : कृष्णा कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर आली असून, निर्बंधांमुळे जेवणावळी बंद आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांना लॉकडाऊन कधी उठेल, याचे वेध लागले आहेत.
१९८९ नंतरच्या कृष्णाच्या प्रत्येक निवडणुकीकडे कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले असते. तीन-तीन पॅनलमध्ये चुरशीच्या लढती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची संख्याही मोठी असते. कार्यकर्ते सांभाळताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असते.
निवडणूक म्हटले की जेवणावळ आलीच. त्यामुळे कार्यक्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांची निवडणुकीत चांदीच होत असते. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचण व उलाढाल ठप्प झालेल्या हॉटेल व्यावसायिकांना कृष्णाच्या निवडणुकीतून आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा होती; परंतु लॉकडाऊन व शासनाच्या निर्बंधामुळे गप्प बसावे लागत आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीसाठी काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात शासनाचे निर्बंध शिथिल होतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
हॉटेल व्यावसायिकांबरोबर कार्यकर्त्यांनासुध्दा लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊन जेवणावळी सुरू होतील अशी आशा आहे. स्पीकर, मंडपवाले, हार-तुरे, चारचाकी भाडोत्री वाहने या सर्वांनाच निवडणूक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आहे. अर्ज माघारीनंतर हॉटेलची जेवणावळ सुरू झाली नाही तर वाडी-वस्तीवरील जेवणावळीत वाढ होईल हे निश्चित.
कोट
इतर निवडणुकांपेक्षा कृष्णाच्या निवडणुकीत हॉटेल व्यावसायिकांना चांगले पैसे मिळतात. उत्तम दर्जाचे जेवण दिल्यास लाखो रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनामुळे हा व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाचे निर्बंध उठले नाहीत तर सर्वांनाच नुकसान सोसावे लागणार आहे.
-रविराज देसाई, हॉटेल व्यावसायिक, शिरटे