सातारा : पालिका शाळांमध्ये सेमी इंग्लिश आणि प्ले ग्रुप सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, एका वर्षातच या वर्गांवर भरलेल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने ठेकेदाराचे बिल अडकवल्याने गेल्या चार महिन्यांपासून या शिक्षकांचा पगारच झालेला नाही.पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व तत्कालीन शिक्षण सभापती अमोल मोहिते यांनी पालिका शाळांमध्ये प्ले ग्रुप व सेमी इंग्लिश ही संकल्पना राबविली होती. खासगी शाळांच्या तुलनेत सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने ही राबविलेली योजना स्तुत्य ठरली. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६, ८, २३, १२ यामध्ये पालिकेने प्ले ग्रुप सुरु केले आहे. अंगणवाडीच्या धर्तीवर एक सेविका व एक मदतनीस अशी दोन पदे प्रत्येक शाळेवर भरण्यात आली होती. शाळा क्रमांक १, ६, १८, १६, १२, १९ व २३ मध्ये सेमी इंग्लिश सुरु करण्यात आले होते. या दोन्ही योजनांसाठी मजूर सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ठेक्यावर शिक्षिकांची नेमणूक करण्यात आली होती. जून २0१३ पासून या दोन योजनांना सुरुवात झाली. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून संबंधित शिक्षकांना पगारच मिळालेला नाही. माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते पदावरुन पायउतार झाल्यानंतर या योजनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. संबंधित ठेकेदाराला पालिकेने बिलच दिले नसल्याने ठेक्यावर भरलेल्या शिक्षकांचे हाल सुरु झाले आहेत. पालिकेने ठेकेदाराचे बिल अदा करावेत, यासाठी या शिक्षकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. (प्रतिनिधी)विनापगार ज्ञानदानया शाळांवर ठेक्याने भरलेले शिक्षक पगार न मिळताही ज्ञानदानाचे काम करत आहेत. पालिकेने रोजी-रोटी पुढेही सुरु ठेवावी, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.
ठेक्यावरील शिक्षकांना पगाराची प्रतीक्षा!
By admin | Published: September 09, 2014 10:44 PM