म्हसवड : बोडो अतिरेक्यांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हुतात्मा झालेले दत्तात्रय माधव सत्रे यांच्या पार्थिवाची सत्रेवाडीकरांना प्रतीक्षा लागली आहे. गावावर दोन दिवसांपासून शोककळा पसरली असून, मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.सत्रेवाडी, ता. माण येथील सुपुत्र दत्तात्रय माधव सत्रे नऊ आसाम रायफल्समध्ये कार्यरत होते. दत्तात्रय सत्रे हे शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वाहनातून अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील मोनमाऊ गावात गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुर्गम भागातून निघालेले जवानांचे वाहन बोडो अतिरेक्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून उडवून दिले. यामध्ये सर्व जवान गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दत्तात्रय सत्रे हे उपचारापूर्वीच हुतात्मा झाले.भारतीय सेनेत कार्यरत असलेले व हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांच्या पार्थिवाबरोबर निघालेले जवान राहुल जगदाळे यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, ‘विमानसेवा रविवारी नसल्यामुळे हुतात्मा सत्रे यांचे पार्थिव सोमवारी दुपारी अडीच वाजता दिब्रुगड येथून विमानाने कोलकत्ता येथे नेण्यात येणार आहे. तेथून रात्री साडेसातच्या विमानाने पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे येथून भारतीय सेनेच्या वाहनातून हुतात्मा सत्रे यांचे पार्थिव भारतीय सनेचे जवान व दहिवडी पोलीस यांच्यासोबत सत्रेवाडीत आणण्यात येणार आहे. सत्रेवाडीत मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.’हुतात्मा जवानाला मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यावर फलक लावले आहेत. पोलीस व प्रशासनाने सत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेची पाहणी केली. मंगळवार, दि. १० रोजी सकाळी आठपर्यंत पार्थिव सातारा, पुसेगाव, दहिवडी मार्गे मलवडी येथे आणण्यात येईल. त्यानंतर मलवडीतून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)आज मलवडी बंदहुतात्मा दत्तात्रय सत्रे यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार, दि. १० रोजी मलवडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
शहीद सत्रेंच्या पार्थिवाची प्रतीक्षा
By admin | Published: February 09, 2015 9:49 PM