पेट्री : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या ११ पर्यटकांना रस्त्यात दरड पडल्याने शनिवारी रात्रभर भांबवलीत मुक्काम करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांनी दरडीचा काही भाग काढला. त्यानंतर रविवारी सायंकाळी पर्यटक पुण्यास गेले.साताऱ्याच्या पश्चिमेस कास गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील वजराई धबधबा पाहण्यास शनिवारी पुण्याचे ११ पर्यटक गेले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तांबी-भांबवली दरम्यानच्या रस्त्यात दरड पडल्याने पर्यटकांची कार भांबवलीत अडकली. त्यामुळे लहान मुलांसह या पर्यटकांनी रात्रभर भांबवलीत मुक्काम करावा लागला.
त्यानंतर पर्यटक व भांबवली ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर जीवाचे रान करून मुसळधार पावसातही दरडीचा रस्त्यावरील मातीचा ढिगारा काढला. तसेच झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे एक गाडी जाण्यापुरता रस्ता मोकळा केला.