सातारा/शिरवळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून संचलन केले जात आहे. खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळसह पळशी याठिकाणी शिरवळ पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संचालन केले. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट देऊन पाहणी केली.लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करत आहेत. आता प्रचाराला रंगत येणार असून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जाणार आहेत. त्यामुळे याच काळात काही समाजकंटकही सक्रीय होत असतात. त्यांच्यावर पोलीस नजर ठेवून आहेत. लोकशाहीचा सोहळा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे या संचलनातून दाखविले जाते. काही ठिकाणी दंगल झालीच तर त्यावर नियंत्रण कसे मिळविले जाणार याचेही प्रात्येक्षिक करुन दाखविले जाते आहे.
यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या नेतृत्वाखाली शिरवळमधील मेनरोड, शिवाजी चौक, शासकीय विश्रामगृह ,चावडी चौक, शहाजी चौक येथे संचलन करण्यात आले. यामध्ये आरसीपी व क्यूआरटीच्या जवानांनी शिरवळ येथील शिवाजी चौक व पळशी याठिकाणी दंगा नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव यांच्यासह शिरवळ पोलीस व आरसीपी व क्यूआरटीचे पोलीस सहभागी झाले होते. दरम्यान, सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला भेट देत पाहणी करत समाधान व्यक्त केले.