वाठार स्टेशन : शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत देऊर, पिंपोडे खुर्द, दहिगाव परिसरातीळ वसना नदीकाठच्या खासगी मळवीतून रातोरात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत वाळूमाफियांनी सर्वांचेच हात ओले केल्याने कारवाई करणार कोण ? हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत माहिती असूनही महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
वाळू उपसा लिलावाबाबत न्यायालयाची बंदी आहे. याशिवाय स्थानिक ग्रामपंचायतींनीही वाळूलिलावाबाबत ग्रामसभा घेऊन हरकती घेतल्याने गाव परिसरात वाळू उपसा बंद आहे. असे असलेतरी नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या खासगी मळव्या माती भरण्याच्या नावाखाली काही रक्कम देऊन विकत घेऊन याचा पुरेपूर मोबदला या शेतकऱ्यांना दिला जात आहे. तर वाळूसम्राट माती उपसण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे काळे सोने विकत आहेत.
रात्रीच्यावेळी नदीकाठच्या जमिनीतून सुरू असलेल्या या खेळात अनेक लोकांची साखळी असल्याने हे व्यावसायिक दिलखुलास वाळू तस्करी करण्यात यशस्वी होत आहेत. या वाळू माफियांवर कोण कारवाई करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासन एका बाजूने पाणी अडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करून जलयुक्त शिवारसारख्या योजनांची अंमलबजावणी करीत आहे. असे असताना वाळूची होत असलेली ही दुकानदारी नकी रोखणार तरी कोण? असाच प्रश्न आहे.महसूलमंत्र्यांनी लक्ष द्यावे...उन्हाळ्यात प्यायच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असलेल्या या भागातील पाणी भविष्यात जिवंत ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी वसनाकाठी सुरू असलेला रात्रीचा वाळू उपसाचा हा खेळ थांबविण्यासाठी खुद्द महसूलमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.