सातारा : निसर्गाच्या साधिन्यात आपल्याला रममान होता यावं यासाठी साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुपच्या वतीने यंदाही सातारा ते सज्जनगड पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा शहराला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. येथील वृक्ष-वेली, पशू-पक्षी पाहिल्यानंतर आपली वन व प्राणीसंपदा किती समृद्ध आहे, याची प्रचिती येते. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला या निसर्गाकडे पाहण्यास वेळच नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुप सातारा ते सज्जनगड पदभ्रमंतीचे आयोजन करीत आहे.
या ग्रुपच्या ४२ सदस्यांनी नुकतीच पदभ्रमंती पूर्ण केली. १६ वर्षांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांनी या पदभ्रमंतीत सहभाग नोंदविला. झाडाखाली थोडा विसावा घेत, गप्पा-गोष्टी करत आबालवृद्धांनी सातारा ते सज्जनगड हे १५ किलोमीटरचे अंतर पाच तासात पूर्ण केले. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालविल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सज्जनगडावर विसावा घेतल्यानंतर प्रत्येकाने आपले अनुभव कथन केले.
(कोट)
निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालविण्याचा आनंद खरोखरच अविस्मरणीय आहे. आपले आरोग्य अबाधित रहावे, असा संदेश आम्ही पदभ्रमंतीच्या निमित्ताने दिला. हा उपक्रम अवितरपणे सुरूच राहणार आहे.
- ईश्वर कदम, भैरोबा डोंगरी ग्रुप
फोटो : ११ पदभ्रमंती
साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुपने आयोजित केलेल्या पदभ्रमंतीत आबालवृद्धांची उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.