विंग : नवरात्रीचा जागर चालू असतानाच विंगचे ग्रामपंचायत सदस्य भागवत कणसे गावोगावी जाऊन ‘लेक वाचवा’चा संदेश देतात. नवरात्रीचे नऊ दिवस ते वेगवेगळ्या गावात जाऊन स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी ते जनजागृती करतात. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे.विंग हे लोकसंख्येच्या दृष्टीने परिसरातील मोठे गावठाण आहे. या गावात दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. नवरात्र, गणेशोत्सव तसेच इतर सण, उत्सवांच्या कालावधीत विविध उपक्रमांतून वेगळेपण जपण्याचा या गावाचा प्रयत्न असतो. अशातच विंग येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत कणसे राबवित असलेला उपक्रम ग्रामस्थांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरत आहे. नवरात्रीच्या कालावधीत भागवत कणसे हे प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांना ‘लेक वाचवा’ हा संदेश देतात. हा आगळा वेगळा उपक्रम परिसरातील ग्रामस्थांसाठी कौतुकाचा विषय आहे. गेली पाच वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. ‘लेक वाचवा’चा संदेश देत असतानाच त्यांना अन्य काही सामाजिक उणिवांची जाणीव झाली. या उणिवा भरून काढण्यासाठी त्यांनी ‘लेक वाचवा’च्या जोडीला ‘पाणी वाचवा’ आणि ‘वीज वाचवा’ या संदेशावरही भर दिला. ‘लेक वाचवा’ सांगत असताना मुलींचे शेकडा प्रमाण किती आहे आणि भावी पिढीसाठी हा किती मोठा धोका आहे, याची जाणीव ते लोकांना करून देतात. याचबरोबर ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ यावर सुद्धा ते मार्गदर्शन करतात. अवेळी पडणारा पाऊस व त्याचे प्रमाण आणि त्याचा शेतीवर व वीजनिर्मितीवर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधून घेतात. ााण्याचा व विजेचा कसा काटकसरीने वापर करवा याची उदाहरणे देतात (वार्ताहर) कन्यारत्नाला हजाराची ठेवपावतीनवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भागवत कणसे नऊ गावांमध्ये फिरतात. या कालावधीत ते फक्त ‘लेक वाचवा’चा संदेश न देता ‘पहिली बेटी, धनाची पेटी’ हे कृतीतून दाखवून देतात. या नऊ दिवसांच्या कालावधीत संबंधित नऊ गावांमध्ये जर कुणाला कन्यारत्न प्राप्त झाले तर, भागवत कणसे यांच्याकडून त्या मातेच्या नावे एक हजार रुपयांची एफडी करण्यात येते. गेली पाच वर्षे सातत्याने हा उपक्रम स्वत:च्या खर्चाने राबविला आहे.
विंग परिसरात घुमतोय ‘लेक वाचवा’चा जागर!
By admin | Published: October 25, 2015 9:16 PM