सणबूर ,दि. १ : आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.
वांग मराठवाडी धरणाच्या कामाला १९९७ साली प्रत्यक्ष सुरूवात झाली. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा यामध्ये धरणाचे काम आजही अपुर्ण स्थितीत आहे. मेंढ, केकतवाडी, घोटील, उमककांचन येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबे पाटण, कऱ्हाड तालुक्यासह सांगली जिल्ह्यात विस्थापित होत आहेत. जुनी घरे मोडून काही धरणग्रस्त नविन गावठाणात विस्थापित झाली आहेत. तर आजही अनेक धरणग्रस्त मुळ जागेवर पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत आहेत.
शासनाकडुन मिळालेली भरपाई रक्कम उपजिवेकीसाठी व अन्य कामासाठी खर्च झाल्याचे धरणग्रस्त सांगत आहेत. गेली वीस वर्ष धरणग्रस्त पुर्नवसनाची वाट पाहतायत. आज ना उद्या पुर्नवसन होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पुनर्वसन झाल्यानंतर नवीन जागेवर, नवीन घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या आशेवरच ते आजपर्यंत चिखल-मातीच्या घरात राहत आहेत. या घरांची त्यांनी दुरूस्तीही केली नाही.
घराच्या भिंती जिर्ण होऊन ढासळू लागल्या आहेत. अनेक घरे अखेरची घटका मोजत आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या धरणग्रस्तांनी त्यांच्या घराच्या भिंती ढासळल्याने घराभोवती आडोशासाठी कुडामेडीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. अशाच खिळखिळ्या घरातच आजही अनेक धरणग्रस्त वास्तव्यास आहेत. हा परिसर भुकंप व अतिवृष्टीचा असल्यामुळे घरे कोसळण्याची भिती असते.
मुळगावात वास्तव्यास असणाऱ्या अनेक धरणग्रस्त कुटुंबाचे अजुनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी अजुनही गाव सोडलेले नाही. शासनाने घरे ढासळुन होणाऱ्या दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाला गती द्यायला हवी.- जगन्नाथ विभुतेधरणग्रस्त, वांगमराठवाडी
गेली वीस वर्ष पुर्नवसन होईल या आशेवर घराची दुरूस्ती केली नाही. आता घरांच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. ही घरे कोणत्याही वेळी भूकंप आल्यास ढासळू शकतात. ही दुर्घटना घडल्यानंतर शासनास जाग येणार आहे का?- मारूती मोहितेधरणगस्त, उमरकांचन