लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दरोड्यातील कोरोनाबाधित आरोपीने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पलायन केल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. जिथे रुग्णच नव्हे तर डॉक्टरही जायला दबकतात तिथे कोरोना वॉर्डात पोलीस आरोपींवर कसे लक्ष ठेवतात, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग केल्यानंतर खाकीची हतबलता समोर आली. आरोपीवर लक्ष ठेवायचं की, स्वत: बाधित होण्यापासून वाचायचं? या विवंचनेतच शंभर मीटर अंतरावर उभे राहून पोलीस बंदोबस्त करत असल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी पळून गेल्यानंतर एरवी मोठा गहजब उडतो. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना खातेंतर्गत चौकशीनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबितही केले जाते. जसे कारण असेल तशी शिक्षा दिली जाते. निष्काळजीपणाचा ठपका ठेवणे समर्थनीय असले तरी प्रत्येकवेळी या पाठीमागे वस्तूस्थिती वेगळीच असते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधून आरोपीने पलायन केल्यानंतर अनेक समस्या पोलिसांसमोर आ वासून उभ्या असल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपीच्या शेजारी डोळ्यात तेल घालून पोलीस खडा पहारा देतात. पण इथं कोरोना वॉर्डात याउलट पाहायला मिळालं. कोरोना वॉर्डात आरोपी इतर रुग्णांसमवेत उपचार घेत असतो. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस मात्र बाहेर दरवाजावर शंभर मीटर अंतरावर उभे असतात. कोरोना वॉर्डमध्ये आरोपी काय करतोय, हे त्यांना दिसतही नाही. एका आरोपीसमवेत चार पोलिसांचे गार्ड असतात. दोन तासांनी त्यांची ड्युटी बदलत असते. कोरोना वॉर्डबाहेर ना बसायला जागा ना झोपायला. तिथे विश्रांती कशी घेणार, असा प्रश्न त्यांना सतावतोय. बाहेरच्या व्हरांड्यात नातेवाईक झोपलेले असतात. त्यांच्याच शेजारी कुठेतरी पायरीवर तासाभराची डुलकी पोलीस काढतात. ज्याची ड्युटी असते, तो पोलीस कर्मचारी कोरोना वॉर्डच्या बाहेर उभा असतो. बऱ्याचवेळेला बाधित रुग्णाचे नातेवाईक कोरोना वॉर्डमध्ये जेवण देण्याच्या बहाण्याने ये-जा करत असतात. त्यामुळे कोण आत जातेय आणि कोण बाहेर येतेय, हे पोलिसांना समजतही नाही. वॉर्डमध्ये कपडे बदलून आरोपी बाहेर पडला तरी कोणाला समजणार नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाबाधित आरोपीने आतून लघुशंकेसाठी जायचे आहे, असे सांगितल्यानंतर पोलिसाला त्याच्यासोबत जावे लागते. काही आरोपी मुद्दामहून पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने रात्री-अपरात्री बोलावून वारंवार त्रास देत असल्याचेही समजले. एकंदरीत या कोरोना वॉर्डमध्ये आरोपीवर लक्ष ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक (चॅलेंजिंग) बाब आहे.
चौकट : आरोपींसाठी स्वतंत्र वॉर्ड हवा...
कोरोनाबाधित आरोपीला इतर रुग्णांसमवेत ठेवल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर लक्ष ठेवता येत नाही. पोलीस वॉर्डबाहेर उभे राहतात. आतमध्ये आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी बाहेर उभ्या असणाऱ्या पोलिसावर येणार. इथे केवळ कायद्याचा वापर होणार; पण परिस्थितीचा विचार होणार नाही. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत आरोपींसाठी स्वतंत्र वॉर्ड गरजेचाच आहे.
फोटो आहे :