सातारा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी, या मागणीसाठी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ यांनी पोलीस बंदोबस्तात सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. वारकऱ्यांनी पोलिसांच्या या कृतीविरोधात मेढ्यात पायी दिंडी काढून निषेध नोंदवला. तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरदेखील ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कऱ्हाडकर हे ठराविक लोकांना घेऊन आळंदीतून पंढरपूरला वारी काढणार होते. आळंदीत ते दाखल झाले होते. मात्र, मागणी करूनही वारीसाठी शासनाने परवानगी दिली नाही. उलट पोलिसांनी बंडातात्या यांना कऱ्हाड येथील गोशाळेमध्ये स्थानबद्ध केले.
या कृतीचा निषेध म्हणून व्यसनमुक्ती संघाचे विलासबाबा जवळ व वारकरी संप्रदाय यांच्यातर्फे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सातारा येथे मोर्चा काढला जाणार होता; याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विलासबाबा जवळ यांना मेढ्यातूनच ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. तसेच सातारा येथे वारीबाबत निवेदन द्यायला निघालेल्या अक्षय महाराज भोसले यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेत दहिवडी येथे स्थानबद्ध केले.
दरम्यान, जिल्ह्यातील समस्त वारकरी संप्रदाय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडून बसला. ‘पायी वारीला परवानगी नाकारणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, उद्धवा अजब तुझे सरकार’ अशा घोषणा देत वारकऱ्यांनी हे आंदोलन केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मार्गदर्शक संभाजी भिडे गुरुजी यांनी बंडातात्या यांच्यावरील कारवाई रद्द करून त्यांना सोडून द्यावे, या मागणीसाठी कऱ्हाडात मोर्चा काढला होता. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या सुटकेसाठी वारकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी व्यसनमुक्ती संघाचे कार्यकर्ते व वारकरी आंदोलनाला बसले होते.
फोटो नेम : ०७ जावेद