कऱ्हाड : डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणूकपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने कच्ची वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यात कऱ्हाड पालिकेचाही समावेश असल्याने कऱ्हाडातील मातब्बर, दादा नगरसेवक, इच्छुकांचे चेहरे चांगलेच फुललेले दिसत आहेत.
कऱ्हाड पालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची मुदत डिसेंबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने कच्च्या प्रारूप वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झालेला आहे.
सध्या कऱ्हाडमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा, जनशक्तीकडे बहुमत, तर लोकशाही आघाडी विरोधी बाकावर अशी स्थिती आहे, पण गत साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जनशक्तीची ‘शक्ती’ भलतीच क्षीण झाल्याचे दिसते. कमळाच्या पाकळ्याही विस्कटलेल्या दिसतात, तर लोकशाही आघाडीला आवश्यक करिश्मा दाखवता आलेला दिसत नाही; पण सगळेच पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
गत निवडणुकीत प्रभाग पद्धती होती. नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडल्या गेल्या होत्या. त्यामुळे यंदाची निवडणूक नक्की कशी होणार? प्रभाग की वाॅर्ड होणार? नगराध्यक्ष कसा निवडला जाणार? याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने कच्ची वाॅर्ड रचना करण्याचे निर्देश दिल्याने आता वाॅर्ड पद्धतीने निवडणुका होतील, असे संकेत जाणकार देत आहेत. परिणामी अनेक हौशी, नवखे, इच्छुक व दादा नगरसेवकांचे चेहरे भलतेच खुललेले दिसत आहेत.
चौकट
राज्य सरकारमध्ये मतभिन्नता...
नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका प्रभाग की वाॅर्ड पद्धतीने घ्यायच्या याबाबत राज्य सरकारमध्ये असलेली मतभिन्नता अनेकदा अधोरेखित झाली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. पैकी काँग्रेस व शिवसेना प्रभाग पद्धतीसाठी आग्रही दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस वाॅर्ड रचनेसाठी आग्रही असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे, पण आता या तीन पक्षांमध्ये मतऐक्य झाले आहे का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
चौकट
पक्षीय झेंडे की आघाड्यांचे राजकारण..
कऱ्हाड पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक लागली तर ती कशी होणार? दुरंगी की तिरंगी लढत होणार? पक्षीय झेंडे खांद्यावर घेणार की पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार? याबाबतही राजकीय मंडळी आखाडे बांधत आहेत.