फलटण : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या याद्यांमध्ये अनेकांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे नावांचा मोठा घोळ झाला असून, इच्छुक उमेदवारांना घाम फुटू लागल्याने त्यांनीही हरकती घेतल्या आहेत. मतदार याद्यांचा घोळ इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या प्रभाग रचनेतही अनेक घोळ होते, समोरासमोरची घरे एका प्रभागात येण्याऐवजी दुसऱ्या प्रभागात आली होती. प्रभाग रचना आहे तसेच राहिल्याने सर्वांचे लक्ष मतदार यादीकडे होते. यामध्येही अनेक घोळ निर्माण झाले आहेत.
फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असून, अनेकांची नावे संबंध नसताना दुसऱ्या प्रभागांमध्ये गेली आहेत. मतदार याद्या बघण्यासाठी नगरपालिकेत विशेष कक्ष स्थापन करणे गरजेचे होते. मात्र, याद्या सर्वसामान्यांना बघता येईल, अशी कोणतीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही.भांडारमध्ये याद्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, तेथे यादी बघायला गेल्यास याद्या विकत घ्या, असा आग्रह नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपले नाव मतदार यादीत आहे का नाही, असल्यास कोणत्या प्रभागामध्ये आहे, हे कळेनासे झाले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असून, या इच्छुकांनी मतदार याद्या विकत घेऊन त्यामध्ये नावे बघण्यास सुरुवात केली असता, त्यांच्या जवळचे किंवा त्या प्रभागमधील असणाऱ्या अनेक मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागांमध्ये गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.काही मतदारांनी ऑनलाइन पद्धतीने नावे बघितली असता ती नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये मतदारांना आढळून आली आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे मतदार पण नावे बदलून घेण्यासाठी आग्रह धरू लागली आहेत. आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात मतदार यादीत घोळ कधीच झाला नव्हता. अनेकवेळा इकडची नावे तिकडची झाली असेल; पण मोठ्या प्रमाणात नावे एका प्रभागातून दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रभागांमध्ये जायची ही पहिलीच वेळ आहे.
मतदारांमध्ये संभ्रमावस्था कायम...सर्वच राजकीय पक्षांनी नावांच्या घोळामुळे मतदार यादीवर आक्षेप घेतले आहेत, हे आक्षेप किती प्रमाणात प्रशासन गांभीर्याने घेऊन दुरुस्त करतात यावर बऱ्याच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहेत. मतदार यादीतील घोळामुळे इच्छुक उमेदवारांच्या डोक्याला मोठा त्रास होत असून, मतदारांमध्ये पण संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, तर नावे न बदलल्यास राहिला एका प्रभागांमध्ये आणि मतदान लांबच्या प्रभागांमध्ये, अशी वेळ मतदारांवर येण्याची शक्यता असून मतदार पण द्विधा मन:स्थितीत आहे.