सातारा : लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी दरवर्षी आषाढीला न चुकता पंढरीची वारी करतो. अनेकांनी ५०-६० वर्षे ती चुकविलेली नाही. पण कोरोनाचा शिरकाव झाला आणि यंदा सलग दुसऱ्या वर्षी वारी चुकली. ही खंत मनात असलेल्या वारकऱ्यांसाठी कऱ्हाडमधील ओम भरमगुंडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डिजिटल वारीच्या माध्यमातून विठुरायाचे दर्शन घडविले आहे.
शेतातील पाने, फुले, पिके, पाण्यामध्ये विठ्ठलाला पाहून काबाडकष्ट करणारा प्रत्येक शेतकरी आषाढीला मैलोनमैल चालून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. वय कितीही झालेले असले तरी त्याच्या मुखात विठ्ठल नामाचा जप सुरूच असतो. अनेक गावांमध्ये असंख्य आजोबा असे आहेत की, त्यांनी आयुष्यात एकदाही वारी चुकवू दिलेली नाही. कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या या वारीला गेल्या वर्षी कोरोनामुळे खंड पडला. अन् मोजक्याच दिंड्या आणि वारकऱ्यांना पंढरीत जाण्यास परवानगी दिली आहे. आता तर पंढरपुरात कडक संचारबंदीच लागू केली आहे.
घरात बसून असलेल्या पांडुरंगाच्या भक्तांना विठुरायाचे दर्शन घडायला हवे म्हणून कऱ्हाड येथील ओम भरमगुंडे याला डिजिटल वारीच्या माध्यमातून मोबाईलवरून दिंडीची अनुभूती देण्याचा संकल्प केला. अन् हा विचार सहकारी हर्षल वाळके, ओंकार जंगम, संकेत पतके, राजेश पाटील, ओम संगवार, आशुतोष नवाळे, ऋषिकेश भाबड यांना बोलून दाखविला. वारीतील विविध प्रसंग दाखविणारे पन्नासहून अधिक चित्रे काढण्यात आली. त्यांना थ्रीडी इफेक्ट देण्यात आला आहे. त्यातून दिंडीतील प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतोय का काय, असे वाटते.
चौकट :
टाळ, मृदंगाचा नाद
समाजमाध्यमातून दिंडीचे दर्शन घडविण्यासाठी एक महिन्यापासून या तरुणांची तयारी सुरू आहे. यामध्ये आळंदी पासून विटेवरील विठुरायापर्यंत वारीतील अनेक प्रसंग रेखाटले आहेत. कोरोना काळात देवदूत ठरलेले डाॅक्टर, परिचारिका तसेच पोलिसांमध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते. या ५० चित्रांना कलातीर्थचे संस्थापक अमोल काळे, अश्विनी काळे-कुलकर्णी प्रसाद सपकाळ यांनी सुंदरपणे गुंफले आहे. त्यामध्ये टाळ, मृदंगाचा नाद वारीचा आनंद मिळवून देतो.
फोटो १८ सातारा-वारी, ०१