सातारा : सातारा शहरातील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासाठी लढा उभारणारे राष्ट्रपती शौर्यपदकविजेते माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी शुक्रवार, दि. ९ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
माळवदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडू्न विलंब होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी ते गेले होते. हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाने दिलेली मुदत मार्च २२ मध्ये संपणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर संबंधित मिळकतदारांचे मोठे नुकसान होईल, तसेच नजराणा करापोटी मिळणारा कोट्यवधीचा महसूल देखील बुडेल, हे स्पष्ट करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी माळवदे यांना ‘सामाजिक कार्य करू नका,’ असे म्हणत कक्षातून बाहेर जायला सांगितले.
माजी सैनिक असून देशसेवेनंतर गेल्या २८ वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे. प्रामाणिक देशसेवेबद्दल राष्ट्रपतींनी गौरवले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता अवमान करत कक्षाबाहेर पाठवले. या हीन वागणुकीविरोधात ९ जुलै रोज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार असल्याचे माळवदे यांनी या पत्रकात म्हटले आहे.