कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील चांदोली रस्त्याचे काम सुरू असून, नवीन पुलाचेही काम सुरू झाले आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता सवादेमार्गे केला आहे. मात्र, पर्यायी रस्ता अतिशय खराब असल्यामुळे सध्यातरी कऱ्हाड मार्गाची संपूर्ण वाहतूक बंद झालेली आहे. तेथून सध्या प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. नवीन पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी मार्ग बनविण्याची जबाबदारी शासन व ठेकेदाराची आहे. तरीही पर्यायी मार्गावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पर्यायी मार्ग दुरुस्त करून व चांगल्या प्रकारे डांबरी करून मिळावा, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
तारळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
पाटण : तारळे, ता. पाटण ग्रामपंचायतीच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन सरपंच बंडा पाटील, उपसरपंच पवेकर यांनी केले. यावेळी अभिवादन करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर माळी, किरण सोनावले, तोफिक डोंगरे, अनिल यादव, रामचंद्र देशमुख, शंकर साळुंखे, रुक्मिणी जंगम, रोहिणी जाधव, पूजा काटकर, अपर्णा जाधव, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण थोरात, साहेबराव खानविलकर, बापूराव जाधव, जयवंत सोनावले, कविता कारंडे, बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.
कऱ्हाड ते पाटण रस्ता चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. काही अंतराच्या एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
सह्याद्री कारखान्यासमोर पथदिव्यांचा उजेड
मसूर : कऱ्हाड-मसूर रस्त्यावर सह्याद्री कारखान्यासमोरील रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील परिसर उजळून निघाला आहे. कारखान्यासमोरील परिसर सातत्याने गजबजलेला असतो. त्यामुळे तेथे पथदिवे बसविणे आवश्यक होते. तेथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे रात्रीच्यावेळी पादचारी आणि सायकलस्वारांसह ग्रामस्थांचीही चांगली सोय झाली आहे. कऱ्हाड-मसूर हा रस्ता वर्दळीचा आहे. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गेट परिसरात मजुरांसह कारखान्यातील कामगार, ट्रॅक्टर चालकांची रहदारी असते. अशा परिस्थितीत याठिकाणी पथदिवे नव्हते. त्यामुळे धोकादायक परिस्थिती होती. सध्या दिवे बसविल्याने परिसर उजळला आहे.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.