शाळा इमारतींची पडझड
सातारा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, वाई, महाबळेश्वर, जावली, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील १२० गावांमधील १५० प्राथमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे सुमारे २ कोटी ६८ लाख ८९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा आहे.
डीएड कॉलेजमध्ये प्रवेश सुरू
सातारा : येथील जिजामाता डीएड कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. त्यासाठी संकेतस्थळावर डीएड प्रवेशाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयामध्ये शासकीय कोट्यातील केवळ ४० जागा उपलब्ध असून, इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या विश्रांती कदम यांनी केले आहे.
कामाठीपुरात कार्यक्रम
सातारा : कामाठीपुरा येथील अभयसिंहराजे भोसले ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय विश्वशांती कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष रमेश वरंगटे, अरुण शिर्के, राहुल वरंगटे, आनंद शिर्के, नितीन शिर्के, रामदास शिर्के, रामदास शिर्के, विक्रांत गुडिले व ग्रामस्थ उपस्थित होते.
ड्रॅगनफ्रूट लागवड केलेल्यांसाठी आवाहन
सातारा : ड्रॅगनफ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पिके संरक्षरणासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
..............