कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांचा वाद ग्रामस्थांना सहन होईना, तर आरोग्य अधिकारी याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. शिपाई, स्वीपर व आरोग्य कर्मचारी यांची रोजची भांडणे, हाणामारी यांना ग्रामस्थ कंटाळले असून, कामातील कामचुकारपणामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा कर्मचाऱ्यांना आळा घाला; अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या केंद्रातील काही कर्मचारी दवाखान्याच्या पाठीमागील असलेल्या शासकीय सदनिकेत राहतात. मागील आठ दिवसांपासून शिपाई हेमंत पाटील व स्वीपर सविता पाटील, तसेच कर्मचारी नीता भोसले यांची रोजच कडाक्याची भांडणे होत आहेत, तर या भांडणात अश्लील शिवीगाळ होत आहे. त्यांच्या कामात अनियमितता असून, अनेक दिवस कामावर गैरहजर राहूनही हजेरीपत्रकावर सह्या करून ते पगार घेत आहेत. त्यांच्या रोजच्या भांडणांना रुग्ण कंटाळले असून, शेजारी राहणाऱ्या लोकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. हे कर्मचारी दवाखान्यात अधिकारी बनून मिरवत आहेत. त्यांना वैद्यकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत, याचे नेमके कारण काय? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आरोग्य केंद्रात बेशिस्त वर्तन करून कर्मचारी तेथील वातावरण दूषित करत आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांना सेवा देतानाही त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. याची तक्रार दिल्यानंतर त्यांना समज दिल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. मात्र, सुधारणा झाल्याचे दिसत नाही. याकडे जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी; अन्यथा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
(कोट)
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपासून हा चुकीचा प्रकार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्तनाला व एकूणच कारभाराला नागरिकांसह रुग्ण कंटाळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारला नाही, तर ग्रामस्थ त्याला टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत.
-अलताब मुल्ला, सरपंच काले