लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडच्या तिसऱ्या लाटेसंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करणाऱ्या राज्य शासनाने कोविड उपचार केंद्रांसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे दुर्दैवाने तिसरी लाट आली, तर राज्याचा आरोग्य विभाग अपुऱ्या मनुष्यबळाच्याआधारे त्याला सामोरा कसा जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी कर्मचारी मदतीला नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने मार्च २०२० पासून सर्व संस्थास्तरावर कोविड साथ हाताळणीसाठी मनुष्यबळाला मंजुरी दिली होती. त्यानंतर कोविड संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कोविड उपचार केंद्रासाठी (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी) नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ ऑगस्टपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मनुष्यबळासाठी निधीच मंजूर नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा कोविड प्रोत्साहन भत्तादेखील १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी स्वतंत्र बालरोग कक्ष, आयसीयू सेंटर आणि ऑक्सिजन निर्मिती, रुग्णवाहिका, रेमडेसिवीर इंजेक्शनसह ४०० बेड वाढणार आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. कंत्राटी कर्मचारी कमी केल्यापासून आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. नोंदी, लसीकरण, रुग्णसेवा, नमुने तपासणी यासह अन्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ लेखाशीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून विशेषतज्ज्ञांचे मानधन अदा करण्यात यावे, नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोविड उपचार केंद्र व कोविड केंद्रासाठी घेण्यात याव्यात, कोविडव्यतिरिक्त इतर काम कमी असल्याने सीएचओ, आयुष एमओ, ग्रुप बी एमओ यांच्या सेवाही कोविड उपचार केंद्रांसाठी घेण्यात याव्यात, स्टोअर ऑफिसर व हॉस्पिटल मॅनेजरची पदे रद्द करावीत, कोविडचे रुग्ण वाढल्यास कोविड व्यतिरिक्त इतर सेवा देत असलेल्या रुग्णालयातील कर्मचा-यांची आवश्यकतेनुसार सेवा घेण्यात यावेत, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.