सातारा : पालिकेतील सभापती निवडीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर खा. उदयनराजे यांनी खांदेपालट न करताच विद्यमान सभापतींनाच मुदतवाढ दिली. खासदारांच्या या निर्णयाने इच्छुकांचा पुरता भ्रमनिरास झाला. सोमवारी झालेल्या या निवडीनंतर आघाडीतील नगरसेवकांमध्ये ‘आम्ही या पदासाठी सक्षम नव्हतो का?’ अशी कुजबुज सुरू झाली आहे.
सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व नियोजन या चार विषय समितींच्या सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाल्याने जिल्हा प्रशासनाने दि. ७ जानेवारी रोजी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी सभापतींची निवडही करण्यात आली. मात्र, सातारा विकास आघाडीतील नवीन चेहºयांना संधी मिळेल, अशी आशा असताना खा. उदयनराजे यांनी विद्यमान सभातींनाच मुदतवाढ देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आघाडीतील काही नगरसेवक, नगरसेविकांनी सभापतिपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये नगरसेवक वसंत लेवे, ज्ञानेश्वर फरांदे, सीता हादगे, लता पवार यांच्या नावाची चर्चा होती. पालिकेत सत्ता स्थापन केल्यापासून उदयनराजे यांनी दरवर्षी नवीन व सक्षम चेहºयांना सभापतिपदाची संधी दिली आहे. यंदाही नव्या चेहºयांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु निवडीवेळी उदयनराजे यांनी घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उदयनराजेंनी स्वत:च सभापतींचे अर्ज भरून घेतले. त्यामुळे त्यांची फेरनिवड होणार असल्याचे निश्चित झाले होते.
निवडी जाहीर झाल्यानंतर उपस्थित नगरसेवकांनी सभागृहातून तातडीने काढता पाय घेतला. यातूनच त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली. खासदारांच्या या निर्णयाने ‘आम्ही सभापतिपदासाठी सक्षम नव्हतो का?’ अशी चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे. काही असो, सभापतिपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी इच्छुकांना वर्षभर वाट पाहावी लागणार, हे निश्चित.
आता लक्ष्य उपनगराध्यक्ष !विद्यमान उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा कार्यकाल दि. २५ जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी नगरसेवक किशोर शिंदे व श्रीकांत आंबेकर यांच्या नावाची चर्चा होती. आंबेकर यांना पाणीपुरवठा सभापतिपदी मुदतवाढ देण्यात आल्याने ते या शर्यतीतून दूर झाले आहेत.या शर्यतीत किशोर शिंदे एकटेच उरले असले तरी निवडीपर्यंत अनेक घडामोडी घडू शकतात. त्यामुळे खा. उदयनराजे स्वच्छ व अभ्यासू चेहरा, आघाडीची ध्येयधोरणे व सातारकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला उपनगराध्यक्ष पदाचा बहुमान देतात की राजेशिर्के यांची फेरनिवड करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.