कऱ्हाड (सातारा) : पंतप्रधान मोदींनी २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशात कमी, पण बाहेरच्या अनेक देशांमध्ये भेटी दिल्या, पण आज अदानी घोटाळा बाहेर आल्यानंतर तसेच श्रीलंकेच्या अध्यक्षांनी अदानीला त्यांच्या देशातील एका कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मोदींनी दबाव आणला असा आरोप केला, यावरून हेच दिसून येते की, मोदींची जगभ्रमंती ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच होती का ? असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.तळबीड (ता. कराड) येथे काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत ६९०व्या स्थानी होते, पण मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांच्या मैत्रीमुळे अदानीचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर आला. मोदी पंतप्रधान होण्याआधी अदानींच्या विमानातून फिरत होते. आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी मोदींच्या सरकारी विमानातून फिरत आहेत. अदानी व मोदी यांच्या मैत्रीबद्दलचे दाखले राहुल गांधी यांनी संसदेत अधिवेशनात मांडून देशाचे लक्ष वेधून घेतले, पण मोदींनी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी कोणते तरी वेगळेच विषय संसदेत मांडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
सूडबुद्धीने कारवाईचा प्रयत्न
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर बंदी घातली व आता राहुल गांधींना केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. राहुल गांधींनी केलेले आरोप यांचे फोटो त्यांनी दाखविले होते तरी त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाईचा प्रयत्न होत आहे.