सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी रात्रीपासून धो-धो पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे तर कोयना धरणात दिवसभरात जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा आला. तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात सारखा पाऊस कोसळत आहे. बुधवारीही दमदार पाऊस झाला तर सायंकाळपासून धो-धो पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना या भागात पावसाने उसंतच दिली नाही. त्यातच धरण परिसरातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
कोयना धरण परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २५१ मिलिमीटर पाऊस पडला तर धरणात २१६७२ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. धरणातील पाणीसाठा ३१.६७ टीएमसी झाला तर बुधवारी सकाळपासून जवळपास ३ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यालाही पावसाने झोडपले. मलकापूरसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूर परिसरात महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाटण तालुक्यातील चाफळ विभागात दाढोली-महाबळवाडी दरम्यानच घाट रस्ता पहिल्याच पावसात खचला. तसेच मोरीपूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली.
चौकट :
जिल्ह्यात सरासरी ४७ मिलिमीटर पाऊस...
कऱ्हाडला ९८ तर महाबळेश्वरला १४३ मिलिमीटर पावसाची नोंद
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. बुधवारपासून गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर आतापर्यंत सरासरी १४३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा - ४० (१४६.६), जावळी - ८०.१ (२३०.९), पाटण - ८२.३ (१७०.३), कऱ्हाड - ९८.९ (२०३.७), कोरेगाव - २०.४ (१०४.४), खटाव - १५.१ (७८), माण - ४.६ (५७.२), फलटण - २.८ (६४.१), खंडाळा - ६.८ (७७.५) , वाई - १८.७ (१२८.४), महाबळेश्वर - १४३ (३८९).