चाफळ : गेल्या चार दिवसांपासून चाफळ गावात चोरट्यांनी शिरकाव केल्याची चर्चा आहे. त्यामुळे युवकांनी उत्स्फूर्तपणे रात्रगस्त सुरू केली असून, या रात्रगस्तीचा फटका एका पाहुण्याला बसला. गुरुवारी रात्री गस्त घालत असताना सापडलेल्या त्या पाहुण्याची युवकांंनी चोर समजून चांगलीच धुलाई केली. या पाहुणचाराने पाहुण्याची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर मारहाण केलेला व्यक्ती गावातीलच एकाचा पाहुणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकाराची सध्या चाफळमध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, धायटी येथेही असाच प्रकार घडला. नाल्यात गेलेली आपली दुचाकी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पाहुणा एका ग्रामस्थाने ‘चोर... चोर...’ अशी बोंब ठोकली. त्यामुळे संपूर्ण गाव मध्यरात्री त्याठिकाणी धावला. खरा प्रकार समोर आल्यानंतर मात्र ग्रामस्थ पोट धरून हसले.पाटण तालुक्याच्या चाफळविभागात सध्या चोरट्यांची मोठी दहशत पसरली आहे. प्रत्येक ठिकाणी चोरांच्याच चर्चा सुरू आहेत. चोरांबाबत अफवा पसरल्या असून, कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस वारंवार करीत आहेत. मात्र, या चर्चा थांबायचे नाव घेत नाहीत. अनेक गावांमध्ये तर उत्स्फूर्तपणे युवकांनी रात्रगस्तही घालण्यास सुरुवात केली आहे. याच रात्रगस्तीचा पाहुण्यालाच चांगला फटका बसला. त्याचे झाले असे की, चाफळ येथे गत आठवड्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. काही ठिकाणी चोरीचेही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. तसेच नांदलाई वॉर्डमध्ये पवार यांच्या घरावर अज्ञात चोरटे आल्याच्या घटनेने चोरट्यांच्या आगमनाला पुष्ठीच मिळाली. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येत मंगळवारपासून गावामध्ये रात्रगस्त घालण्यास सुरुवात केली आहे. रात्रगस्त घालत असतानाच गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी कार्यक्रमासाठी गेलेल्या गावातील काही युवकांना नांदलाई खडीला चोर आल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हे युवक चाफळला दुचाकीवरून येत असताना ‘वळीचा आंबा’ याठिकाणी एक संशयित व्यक्ती त्यांना आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गावातील एकाचे नाव सांगत मी त्यांचा पाहुणा असल्याचे सांगितले. त्यावेळी या युवकांनी खात्री करण्यासाठी त्या व्यक्तीला संबंधिताच्या घरी नेले; परंतु घरातील व्यक्तीनी याची आमची ओळख नसल्याचे सांगताच जमलेल्या युवकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर लगेचच संबंधितांनी आमची ओळखण्यात चूक झाली ती व्यक्ती आमचेच पाहुणे आहेत, असे सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीची सुटका झाली.विभागातील धायटी येथेही असाच प्रकार घडला. वेळ रात्री साडेअकरा ते पावणेबाराची. नाल्याकडेला काहीतरी खटपट करताना अनोेळखी दोघांना एका ग्रामस्थाने पाहिले. त्यावेळी त्याने ‘चोर... चोर...’ अशी बोंब ठोकल्याने सर्व गाव घराबाहेर आला. मात्र, वस्तुस्थिती समजल्यानंतर प्रत्येकजण आल्या पावली परत गेला.धायटीकडे चोरट्यांचा शिरकाव झाला नसला तरी ग्रामस्थांच्या मनात चोराविषयी भीती असल्यामुळे प्रत्येकजण रात्रीही जागरूक राहत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली. रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास बेबलेवस्तीतील एक ग्रामस्थ लघुशंकेसाठी घराबाहेर आला. त्यावेळी त्याला दोन व्यक्ती नाल्यातून दुचाकी ओढत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीने चोर समजून ग्रामस्थांना मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली. या ओरडण्याच्या आवाजाने वस्तीतील सर्वजण धावतच घराबाहेर आले. चोरांच्या दिशेने धावले; परंतु जवळ गेल्यानंतर संबंधित दोघेजण बेबलेवाडी येथेच पाहुणे आले होते. अनोळखी रस्त्यामुळे त्यांची दुचाकी नाल्यात गेली. दुचाकी नाल्यातून बाहेर काढत असताना संबंधित ग्रामस्थाने पाहिले व गैरसमज होऊन त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. धायटी विभागात सध्या या घटनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.दरम्यान, चाफळसह परिसरात चोरटे आल्याची चर्चा होत असली रात्री-अपरात्री निदर्शनास येणाऱ्या व्यक्तीची खातरजमा केल्याशिवाय त्याला मारहाण करू नये. तसेच त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. रात्रगस्त घालणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचाही समावेश असावा व त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर) पोलिसांनी घेतली ग्रामस्थांची बैठकचाफळ येथे आठ दिवसांपासून सुरू असलेल्या चोरांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी गावातील मारुती मंदिरात पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, युवक यांची उपस्थिती होती.खबरदारी घ्या; पण अतिउत्साह नको !चाफळमध्ये नांदलाई वॉर्डमध्ये घटना घडली की, लगेच गावातील जागृत युवकांनी रात्रगस्तीस सुरुवात केली, ही कौतुकास्पद बाब आहे. आपल्या गावाचे आपणच रक्षण केले पाहिजे. ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन युवकांचे वेगवेगळे गट करून रात्रगस्तीचे नियोजन केले पाहिजे. रात्रगस्त घालत असताना घरामध्ये झोपलेल्या लोकांना याचा त्रास होणार नाही,याचेही भान ठेवणे आवश्यक असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
चोर समजून पाहुण्यांची धुलाई!
By admin | Published: July 22, 2015 9:43 PM