मलकापूर : डोळ्यात मिरचीपूड टाकून युवतीच्या हातातील महागडा मोबाईल पळविणाऱ्या धूमस्टाईल चोरट्याचा युवकांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. काही वेळात चोरटा हाताला लागल्यानंतर जमावातील अनेकांनी त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ढेबेवाडी फाटा-मलकापूर येथे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दीपक शिवाजी यादव (वय २४, रा़ होली फॅमिली स्कूल पाठीमागे, विद्यानगर) असे जमावाने पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या चोरट्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापुरातील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी नियती ललीतभाई पटेल (वय १९) ही युवती रविवारी रात्री मैत्रिणी व मित्रासमवेत ढेबेवाडी फाटा येथे आली होती. नियतीसोबत आलेला मित्र व मैत्रीण उपमार्गालगतच्या बेकरीत खरेदी करीत असताना नियती तेथून जवळच मोबाईलवर गेम खेळत थांबली होती. काही वेळानंतर एका युवकाने नियतीला धक्का दिला. त्यामुळे नियतीने पाठीमागे वळून पाहिले. त्यावेळी संबंधित युवकाने नियतीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. तसेच तिच्या हातातील सुमारे अठरा हजार किमतीचा महागडा मोबाईल हिसकावला. डोळ्यात मिरचीपूड गेल्यामुळे नियतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिक त्याठिकाणी धावून आले. नियतीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नागरिकांसह युवकांनी त्या चोरट्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. चोरटा ढेबेवाडी फाट्याकडे पळाला. नागरिकही त्याच्यामागे धावले. त्यानंतर तो पश्चिमेकडील उपमार्गालगत असलेल्या जाधव यांच्या लाकडाच्या वखारीत जाऊन लपला़ पाठलाग करणाऱ्या युवकांनी अंधारातही संबंधित चोरट्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कंपाऊंडवरून उडी मारून पळाला असावा, अशी शक्यता निर्माण झाल्याने नागरिक परत फिरले. त्याचवेळी चोरटा वखारीतील लाकडांमध्ये लपून बसल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी त्याला लाकडाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले़ वखारीतीलच लाकडाच्या दांडक्यांनी त्याला बेदम चोप देत शिवछावा चौकात आणले़ त्यावेळी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून संबंधित चोरट्याला ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी चोरट्याला पोलीस ठाण्यात आणले. याबाबत गुन्हा दाखल करून चोरटा दीपक यादव यास अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता -चोरीसाठी वापरलेली मिरचीपूड, त्याची चोरी करण्याची पद्धत, धाडस व त्याने परिधान केलेले वेगवेगळे कपडे विचारात घेता संबंधित चोरटा सराईत असल्याचे निष्पन्न होत आहे़ त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. अंगात एकावर एक तीन ड्रेस -चोरट्याला जमावाकडून बेदम चोप दिला जात असताना त्याच्या अंगावरील कपडे फाटले. त्यावेळी त्याने एकावर एक असे तीन पोशाख परिधान केल्याचे नागरिकांना दिसून आले. चोरी करून पळाल्यानंतर अंगावरील एक ड्रेस काढून टाकायचा, असा त्या चोरट्याचा मनसुबा असावा. कपडे बदलल्यामुळे आपल्याला कोणी ओळखणार नाही, यासाठी त्याने ती शक्कल लढवली असावी.
तरुणीच्या डोळ्यात तिखट फेकणाऱ्याची धुलाई!
By admin | Published: February 02, 2015 10:11 PM