वाठार स्टेशन , दि. २१ : कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रेवडी गावामधून परतवडी व भक्तवडी या दोन गावांमध्ये जाण्यासाठी १९८० साली वसना नदीवर पूल उभारण्यात आला. सिमेंटच्या पाईपचा वापर करुन साधारण २०० ते २५० फूट लांबीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला.
हा पूल गेल्या दोन वर्षांपासून खचू लागला आहे. तसेच अवजड वहानांमुळे अनेक ठिकाणी सिमेंटच्या पाईपला तडे गेले असून पुलावरील संपूर्ण डांबरी भाग निघुन गेला आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्याने या पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
उंची कमी असल्याने हा पुल कोणत्याही क्षणी पाण्यात जाऊ शकतो. पुलाची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन बांधकाम विभागाने तत्काळ या पुलाची दुरस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ तसेच वाहनधारकांमधून होत आहे.
रेवडी गावातून परतवडी-भक्तवडी या गावांना जोडणारा वसना नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुलाची तातडीने दुरूस्ती न केल्यास दोन गावांचा संपर्क तुटणार आहे- नरसिंग दिसले,ग्रामस्थ परतवडी