महाबळेश्वर : निसर्गसौंदर्याने नटलेली प्रेक्षणीय स्थळे हे महाबळेश्वरचे मुख्य भांडवल आहे. हे ओळखून हॉटेल्स संघटनेने वनविभागाच्या सहकार्याने येथील प्रेक्षणीय स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच इतर कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली.
महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. येणारा प्रत्येक पर्यटक येथील निसर्ग सौंदर्यांचा मनमुराद आनंदही लुटत असतो. पर्यटक परतीच्या प्रवासाला लागताना आपल्यासोबत सुंदर आठवणी घेऊन जातात. मात्र, जाता-जाता प्लास्टिकच्या बाटल्या, कुरकुरे, लेजची पाकिटे आदी वस्तू जंगलात व प्रेक्षणीय स्थळांवर टाकून जातात. त्यामुळे निसर्गाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. निसर्ग स्वच्छ, सुंदर राहिला तरच महाबळेश्वरचे अस्तित्व अबाधित राहणार आहे. ही गरज ओळखून महाबळेश्वर येथील हॉटेल संघटनेने वनविभागाच्या सहकार्याने येथील मुख्य विल्सन, केट्स, एलिफंट हेड, लॉडविक आदी ब्रिटिशकालीन पाॅईंटची स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊची पाकिटे, लेज कुरकुरेचे रॅपर्स व इतर कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय कमलेकर, विजय गोसावी,सहदेव भिसे, लहू राऊत आदी उपस्थित होते.
फोटो : १९ महाबळेश्वर
महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉईंटवर हॉटेल संघटना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (छाया : अजित जाधव)